गांडूळ खत (vermi compost) निर्मिती

| 30 Mar 2018 | 6172 |



शेतकरी बंधूंनो, आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती मिळवणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर  रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत. तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पहिला तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत. गांडूळ खत हा सेंद्रिय शेती मधलाच एक घटक आहे. गांडूळ खत हे शेतकरी स्वतः तयार करू शकतात त्यामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात खूप बचत होते तसेच शेताचा पोत देखील सुधारतो. त्याच बरोबर गांडूळ खत निर्मितीकडे शेतीपूरक जोडधंदा म्हणून ही पाहू शकतात. चला तर मग, गांडूळ खत निर्मितीची माहिती घेऊ.

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वत:च्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.


गांडूळ खत निर्मिती:
गांडूळ खत निर्मितीसाठी जागा निवडत असताना सावली असले अशी जागा निवडावी. एकाद्या झाडाखाली, छपरामध्ये, किंवा खोलीमध्ये गांडूळ खताचा बेड असावा. जिथे बेड असेल तेथील जमीन टणक असावी. जेणेकरून गांडूळ जमिनीमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. खालील फोटोमध्ये दिल्याप्रमाणे अलीकडे प्लास्टिकचे रेडिमेड बेडही मिळत आहेत त्याचादेखील आपण विचार करू शकतो.


                         


१० फूट लांब ३ फूट रुंद आणि २ फूट उंच असा बेड तयार करावा. सुरवातीला त्यामध्ये पालापाचोळा, उसाचे पाचट  गवत  ६ इंचाचा थर करावा. त्यावर एक ते दीड फूट शेणखत टाकावे. आता यावर २ किलो गांडूळ सोडावे आणि त्यावर बर्दनाने(पोत्याने) झाकून १० ते २० लिटर पाणी रोज मारावे. पोती झाकताना वापसा राहील याची काळजी घ्यावी. सात ते आठ दिवसात गांडूळाची विष्टा दिसायला लागेल.  याचाच अर्थ आपला गांडूळ खात तयार होत आहे. अश्या पद्धतीने ३० ते ३५ दिवस पाणी मारत राहावे. त्यानंतर तुम्हाला निदर्शनास येईल कि गांडूळ खत तयार झाले आहे. मग काही दिवस पाणी मारणे बंद करावे. 

गांडूळ खात कोरडे झाल्यानंतर त्या गांडूळ खाताला छोट्या भागात विभागून चाळून घ्यावे. आणि हे खात गोणी मध्ये भरून ठेवावे आणि लागेल तसे वापरावे. जर गांडूळ खताचा व्यवसाय करणार असाल तर योग्य त्या वजनाची गोणी भरून घ्यावीत व विक्रीसाठी ठेवावे. गांडूळ खताचा व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनुदान देत असते त्याचबरोबर योग्यवेळी मार्गदर्शनही करते.

 


गांडूळ खत तयार करताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

- साप उंदीर बेडूक मुंगी यासारख्या प्राण्यांपासुन तसेच पक्ष्यांपासून गांडूळाचे सौरक्षण करावे.

- गांडूळ खताच्या बेड वर सुर्यप्रकाश नाही पडणार याची काळजी घ्यावी .

- गांडूळ खताच्या बेडमध्ये पाणी साठू देऊ नका.

- कांदा, लसूण, तेल, कीटकनाशक,प्लास्टिक यासारख्या वस्तू व मसालेदार पदार्थ गांडूळ खताच्या बेडमध्ये टाकू नका. गांडूळ खताच्या बेडमध्ये साबण, लिंबूवर्गीय पदार्थ टाकू नका.


गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजी

- गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते कीटकनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरु नयेत.

- गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकवणे आवश्यक आहे.

- गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रीय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रीय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.

- योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेते घट येते.


गांडूळाचे खाद्य

- शेणखत, घोडयाची लीद, लेंडी खत , हरभ-याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.

- स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष , वाळलेला पालपाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.

- हरभ-याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.

- गोबरगॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.




गांडूळ खत बनविण्यासाठी गांडुळे सर्वत्र कशी उपलब्ध होतील ?

- गांडूळ खतासाठी उत्तम प्रजातीची जसे कि – इओसिना फोटीडा, युड्रीलीस युजीनी आणि ऑस्ट्रेलीयन स्प्रिंग अर्थवर्म अशी गांडुळे निवडावीत.

- देशी गांडुळे खत बनविण्यासाठी वापरू नयेत कारण ती जास्त माती खातात व सेंद्रिय पदार्थ कमी खातात. त्यामुळे खत उत्तम प्रतीचे बनत नाही. 

- त्याकरिता उपरोक्त सांगितलेल्या प्रजातीची गांडुळेच गांडूळ खत बनविण्यासाठी वापरावीत.

- आता प्रश्न उरतो तो गांडूळ उपलब्ध कोठे होतील? तर कुठल्याही कृषी विज्ञान केंद्रात ती उपलब्ध होऊ शकतात किंवा मग गांडूळांच्या अंड्यांनी युक्त असे कल्चर उपलब्ध झाल्यास आपण गांडुळे आपल्या बागेत उत्पादित करू शकतो. 


शेतकरी मित्रांनो तर मग तुम्हीही गांडूळ खत तयार करा आणि खालील कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला तुमचा अनुभव सांगा. काही शंका असल्यास  कंमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि तुमच्या प्रतिक्रिया पण नोंदवा. धन्यवाद.  

  


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  


Back to Articles List