नमस्कार मंडळी, आज आपण माती परीक्षण या विषयावर चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना माहित आहेच कि माती परीक्षण हि काळाची गरज झाली आहे. जवळ जवळ ६०% उत्पन्न हे मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. कोणत्याही ऋतू मधली पिकं ही मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असतात. तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात तरी शेतीचे उत्पन्न वाढवणे खूप कठीण आहे. शेतामध्ये चांगले पीक आणण्यासाठी सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. हे आपण एका लेखात पहिले आहे. शेतीतील एक नियम असा सागतो कि तुम्ही तुमच्या पिकाला सगळे सूक्ष्म पोषक घटक दिले आणि त्यातील एक घटक जरी थोडा कमी झाला तरी देखील एकूण उत्पन्नात खूप घट होत असते.
एकाच पिकासाठी आवश्यक असलेली खताची मात्रा आणि प्रकार हे शेत व एकाच शेतातील माती ह्या नुसार बदलू शकते. शेताची सुपीकता वाढविण्यासाठी योग्य खताचा प्रकार व त्याची मात्रा निश्चित करणे गरजेचे असते. माती परीक्षण विना अयोग्य प्रकारची व अयोग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. मृदा तपासणी कृषि प्रयोगशाळे- द्वारे केली जाते. प्रयोगशाळेतील चाचण्या ही तीन प्रकारांमध्ये वनस्पतींच्या पोषक तत्वांचे परीक्षण करतात.
महत्वाचे पोषक: नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K) [याची माहिती आपण काही दिवसांपूर्वी घेतली आहे ]
माध्यमिक पोषक: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर
सूक्ष्मपोषक: बोरॉन (boron - B), क्लोरीन (chlorine - Cl), तांबे (copper - Cu), लोहा (iron - Fe), मॅगनीज (manganese - Mn), मोलिबडेनम (molybdenum - Mo) आणि जस्त (zinc - Zn).
ह्या खेरीज मातीची pH पातळी पण तपासली जाते त्यावरून मातीची आम्लता (अम्लीय किंवा अल्कधर्मी) कळून येते.
माती तपासणीचा उद्देश:
१. पोषक घटकांच्या पातळीनुसार मातीची विभागणी करणे
२. त्यानुसार खत शिफारस करणे. खत निवडीला अचूक मार्गदर्शन करणे.
माती परिक्षणाची जागा कशी निवडावी :
१. मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा.
२. शेतातील वेगवेगळ्या ठिकाणाची माती गोळा करावी. नमुने घेण्याची जागा हि मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती ह्या वर ठरते. त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फार लहान भाग पाडू नयेत.
३. जुने बंधारे(पाटाखालील बांधा जवळची), दलदली ची जागा, नुकतेच खत दिलेले व खते आणि कचरा टाकण्याची जागा, गुरे बसण्याची व झाडाखालची माती असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडु नये.
४. सर्वात अगोदर वरील माहिती ध्यानात धरून नमुने घेण्याची जागा निश्चित कराव्यात.
५. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. माती नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी.
६. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4 समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4 समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी.
७. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि माती परीक्षण केंद्र मध्ये जमा करावी.
मित्रांनो आपल्याला हि माहिती कशी वाटली हे खाली दिलेल्या comment बॉक्स मध्ये नोंदवा. लवकरच आपल्यासाठी नवीन विषय घेउन येईन तो पर्यंत धन्यवाद !!!
Like Facebook page to stay updated!